ठाणे : नौपाडा येथील मराठा मंडळ इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीमध्ये वॉटर प्रूफिंगचे काम करत असताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. यामध्ये अन्य दोन कामगारही बेशुद्ध पडले. या कामगारांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांच्या प्रकृतीस धोका नसल्याची माहिती महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या प्रकरणाची नौपाडा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
हरिनिवास सर्कल येथे मराठा मंडळाची तळ अधिक तीनमजली इमारत असून या इमारतीच्या गच्चीवर पाण्याची टाकी आहे. रविवारी या टाकीची साफसफाई केल्यानंतर कंत्राटदाराच्या कंपनीचे चार कामगार टाकीमध्ये वॉटर प्रूफिंगचे काम करत होते. मात्र हे चौघेही बेशुद्ध पडले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, नौपाडा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. तसेच प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या सर्व कामगारांना टाकीमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. परंतु योगेश नरवणकर (३९) आणि विवेक कुमार (३०) या दोघांचा मृत्यू झाल्याचे सरकारी रुग्णालयामधील डॉक्टरांनी घोषित केले. तर गणेश नरवणकर (३८), मिथुन ओझा (३०) या दोघा कामगारांच्या प्रकृतीस धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १८ कोटींची फसवणूक; महिला अटकेत दोन दिवसांत १५०० बॅनर उतरवले
हे चारही कामगार वागळे इस्टेटमधील इंदिरानगर भागात राहात असल्याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. वॉटर प्रूफिंगच्या कामासाठी रसायन वापरण्यात आले होते. त्यामुळेच दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी व्यक्त केली.