पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कनन मुथ्थुस्वामी असे आरोपीचे नाव आहे. गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटीमध्ये आरोपी काम करतो. त्याचे चिमुकल्याच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिने लग्नाला नकार दिला. कारण त्यांच्या लग्नाला तिच्या आईचा विरोध होता. ती तरुणीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून देणार होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. यावरून तरुणीची आई आणि त्याच्यामध्ये वादही झाला होता. याच रागातून त्याने चिमुकल्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
आरोपीने मुलगा झोपेत असताना, त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह गोरेगाव पूर्वेकडील एका पाण्याच्या टाकीत फेकले होते. वृत्तानुसार, २६ मार्च रोजी ही घटना घडली होती. तक्रारदार महिला ही तिच्या चार मुलांसोबत गोरेगाव पूर्वेकडील उड्डाणपुलाच्या खाली फुटपाथवर राहते. घटनेच्या दिवशी तिच्या दोन मुली आणि जावई नातेवाइकांकडे गेले होते. महिला आणि तिची दोन्ही मुले झोपडीत झोपले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास तिला जाग आली. ती स्वच्छतागृहात गेली होती. तिकडून परतल्यानंतर सात महिन्यांचा मुलगा बेपत्ता असल्याचे समजले. तिने त्याला सर्वत्र शोधले. पण सापडला नाही. तिने पोलीस ठाणे गाठले आणि बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी मुथ्थुस्वामीबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून, न्यायालयात हजर केले. त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बाळाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.