ठाण्यातील कळवा पूर्व येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर परिसरातील व्यक्तीने अतिप्रसंग केला. पीडित मुलगी गतीमंद आहे. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना ६ मार्च रोजी घडली होती. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबातील एका सदस्यानं याबाबतची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बालक संरक्षण हेल्पलाइन क्रमांकावरून दिली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी कळवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. पीडित मुलीकडे विचारणा केल्यावर तिने आरोपीचे वर्णन सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळवा भागातील मनीषा नगर, कळवा नाका, गणपती पाडा, पारसिक नगर, भास्कर नगर, पौंडपाडा, वाघोबा नगर या परिसरात आरोपीचा शोध घेतला. खबऱ्यांकडूनही पोलिसांना काही माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेनेही आरोपीला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपी हा विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. तो काही महिन्यांपूर्वी या परिसरात राहण्यासाठी आला आहे. नालेसफाई आणि बांधकामाच्या ठिकाणी तो मजुरी करतो. त्याने गतीमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. एका कंपनीच्या परिसरात झुडपांत नेऊन त्याने मुलीवर अत्याचार केला, अशी माहिती कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली.