करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यांतून या बैठकीत सहभागी झाले
या बैठकीत प्रारंभी करोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सूचना केल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे ती प्राधान्यक्रमाने करण्यात येईल असे सांगितले. होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरित अशा ५.५० लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times