नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीला राज्याचे नवनिर्वाचित गृहसचिव आनंद लिमये आणि मुंबईचे पोलीस आयु्क्त संजय पांडे हेदेखील उपस्थित होते. ही नियमित बैठक असल्याचे गृहमंत्र्यांकडून सांगितले जात असले तरी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच गृहखात्याच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार या बैठकीत दिलीप वळसे-पाटील यांना काही सूचना देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीत तशी कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ सार्वजनिक कामांबाबत चर्चा झाली, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या हाताळणीवरून नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात खमकेपणाने प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु, दिलीप वळसे-पाटील यांनी बॅकफूटवर जाऊन सावध पवित्रा घेतला. फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आक्रमक आणि सडेतोड भाषण करण्याची गरज होती, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांदेखत नाराजी व्यक्त केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची बाजू सावरून घेतली होती.