सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला निधीवाटपापासून अनेक गोष्टींमध्ये दुय्यम वागणूक मिळते. राष्ट्रवादीकडून असाच अपमान होणार असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार करावा, असा विचार शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोलापूरमधील कार्यक्रमात बोलून दाखवला होता. याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून युवासेना नेते वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी तानाजी सावंत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. येणारा काळ हा शिवसेनेचा असेल. पण आत्ता शिवसेनेला नव्या मित्रांची गरज असल्याचे सांगत वरूण सरदेसाई यांनी तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सबुरीचे धोरण स्वीकारण्याचा अप्रत्यक्ष सल्ला तानाजी सावंत यांनी दिला.

तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर होणाऱ्या अन्यायाची यादी वाचून दाखवली. मी शिवसेनेचा पदाधिकारी किंवा नेता नाही. आज मी याठिकाणी युवासेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित आहे. पण तुम्ही जी काही अन्यायाची यादी वाचून दाखवलीत ती मी जशीच्या तशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन वरुण सरदेसाई यांनी दिले.

सध्या आपल्याला दोन नव्या मित्रपक्षांकडून हवी तशी साथ मिळत नाही, असे तुम्ही सांगत होतात. पण साहेब, हे तर दोन नवे मित्रपक्ष आपले ३० वर्षांचे विरोधक आहेत. जे ३० वर्षे सोबत होते, त्यांनी काय वेगळं केलं? जे आपल्या अंगठ्याला पकडून खांद्यावर बसले, त्यानंतर डोक्यावर बसले. डोक्यावर बसल्यानंतर त्यांनी आपल्याला गाडायचा प्रयत्न केला. अशा मित्रांना घरी बसवण्यासाठी आपल्याला नवीन मित्र जोडावे लागलेत. आत्ताची परिस्थिती काहीही असो. पण येणारा काळ हा फक्त आणि फक्त शिवसेनेचा असेल, हे मी तुम्हाला सांगतो, असे वरूण सरदेसाई यांनी म्हटले. वरुण सरदेसाई यांच्या एकूण वक्तव्याचा रोख पाहता तुर्तास शिवसेना ही राष्ट्रवादीबाबत सबुरीचे धोरण बाळगण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. त्यामुळे आता तानाजी सावंत वरुण सरदेसाई यांचा हा सल्ला कितपत मनावर घेणार, हे पाहावे लागेल.

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पामध्येही हेच दिसून आलं आहे. ६०-६५ टक्के बजेट राष्ट्रवादीला, ३० ते ३५ काँग्रेसला, उरलेल्या १६ टक्क्यातहीही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ १० टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा साधा ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो अन् आमची केवळ गोड बोलून बोळवण केली जाते. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु. गेल्या अडीच वर्षात झाला तसा केवळ अपमानचं होणार असेल तर उद्धव साहेब आपण वेगळा विचार करायला हवा, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले.

Tanaji Sawant Varun Sardesai

Varun Sardesai: आत्ता शिवसेनेला नव्या मित्रांची गरज असल्याचे सांगत वरूण सरदेसाई यांनी तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सबुरीचे धोरण स्वीकारण्याचा अप्रत्यक्ष सल्ला तानाजी सावंत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here