करोनाच्या नव्या व्हेरिएंटची कोणती लक्षणे दिसू शकतात?
ओमिक्रॉन BA.2 ची बाधा होण्याआधी पोटाशी संबंधित विविध लक्षणे दिसून येत असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार कॅलिफोर्नियाच्या ‘सेंटर फॉर फंक्शनल मेडिसिन’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुंज्या श्वेग यांनी या विषाणूच्या लक्षणांबाबत भाष्य केलं आहे.
ताप आणि अशक्तपणा
करोना विषाणूची लक्षणे ही प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असल्याचं याआधी अनेकदा दिसून आलं आहे. या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून आली आहेत. मात्र ओमिक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटमध्ये सुरुवातीला घसा दुखण्यासह इतर लक्षणेही दिसू शकते, असं डॉ. श्वेग यांचं म्हणणं आहे.
तापानंतर वाढू शकतो खोकला
डॉ. सुंज्या श्वेग यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णाला तापानंतर सर्दीसह खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो. त्यानंतर खोकल्यामुळे गळ्याला सूज येऊ शकते आणि डोकेदुखीही वाढण्याची शक्यता निर्माण होते.
स्नायूंमध्ये वेदना
स्नायूंमध्ये वेदना होणे हे करोनाचं सर्वसाधारण लक्षण आहे. या आजारात स्नायूच्या वेदना हळूहळू वाढून नंतर गंभीर रूप धारण करू शकतात.
उलटी आणि पोटासंबंधित इतर समस्या
ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या व्यक्तीला उलटीचा त्रास सुरू होऊ शकतो. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्णांना उलटीचा त्रास सर्वाधिक जाणवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.