यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख होता. मातोश्री हा उल्लेख आपल्या आईबाबत केला होता, असे जाधव यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी जाधव प्रकरणाबाबत विचारणा केली होती. त्यावर हा विषय वाढवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते. आता या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांनाच टोला लगावला आहे. ‘मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेले ५० लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावर भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल’, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. सोमय्या यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काय म्हणाले होते अजित पवार?
‘मातोश्री’ला दोन कोटींची भेट आणि ५० लाख रुपये किंमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख यशवंत जाधव यांच्याकडील डायरीत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्तिकर खात्याच्या हाती ही डायरी लागली होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारणा केली होती. त्यावर हा विषय फार वाढवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करतील. जाधव यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही या विषयाला पुन्हा का उकळी दिली जात आहे? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला होता.
किरीट सोमय्या कांगावा करतात तर, नितेश राणे स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करतात | विनायक राऊत