पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ जेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये…
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार ५० वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया ५० दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे-पवार कुटुंबावर निशाणा
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापा मारला होता. या छाप्यात अधिकाऱ्यांच्या हाती एक डायरी लागली होती. त्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपयांची भेट आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावरून किरीट सोमय्यांनी ठाकरे आणि पवार कुटुंबावर निशाणा साधला. माफिया सेना स्वतःला वाचवण्यासाठी आता यशवंत जाधवांच्या आईचं नाव घेत आहेत, असं ते म्हणाले. जाधव आपल्या आईला ५० लाख रुपयांचं घड्याळ देणार का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.