टिटवाळानजीक बल्याणी परिसरात उमर शहा हा पत्नी गुलशन, सात वर्षांचा मुलगा अरिष, तीन वर्षांची मुलगी आयरा आणि दीड वर्षाचा मुलगा अरसलान यांच्यासोबत राहतो. उमर विक्रोळी येथे नोकरीला आहे. २४ तारखेला तो नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघून गेला. त्यानंतर साडेअकरा वाजताच्या सुमारास उमर याची तिन्ही मुलं घराच्या जवळच असलेल्या मैदानात पार्क केलेल्या टेम्पोशेजारी खेळत होते. त्याचवेळी टेम्पोचालक आला. त्याने आजूबाजूला किंवा समोर बघितलेच नाही. टेम्पो थेट पुढे नेला. या टेम्पोखाली दीड वर्षाचा अरसलान सापडला. अंगावरून चाक गेल्यानं जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात चालक सैफ फारुखी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.