नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतातील करोना रुग्णसंख्येत (India Coronavirus Cases) मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल करण्यात आले होते. भारतातील करोना संसर्ग आटोक्यात आल्याने अमेरिकेनेही भारताचा समावेश करोनाचा सर्वाधिक कमी धोका असणाऱ्या देशांच्या यादीत केला आहे. ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन’ने भारताचा समावेश तिसऱ्या गटातून पहिल्या गटात केला आहे.

जगभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडून या विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी इतर देशांप्रमाणे अमेरिकेनेही निर्बंध लादले आहेत. समोरच्या देशातील करोना प्रादुर्भावाची स्थिती पाहून या निर्बंधांमध्ये बदल केले जातात. तिसऱ्या लाटेतील करोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेने भारताचा समावेश करोनाचा धोका असणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या गटात केला होता. मात्र सध्या भारतातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या घटल्याने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय अमेरिकेतील प्रशासनाकडून घेण्यात आला.

धक्कादायक! शिवभोजन थाळीची भांडी धुतली जातायत शौचालयात, शासनाचे चौकशीचे आदेश

भारतातून अमेरिकेत जाताना कोणते नियम पाळावे लागणार?

अमेरिकेने विविध देशांतील करोना स्थितीनुसार एकूण चार गट केले आहेत. ज्या देशात करोना संसर्गाचा दर जास्त आहे अशा देशांचा समावेश चौथ्या गटात करण्यात आला आहे. भारताचा समावेश पहिल्या गटात करण्यात आल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी अमेरिकेत प्रवेश करताना काही नियम पाळावे लागणार आहेत. ‘भारतातून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांसाठी करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक आहे. तसंच प्रवासाआधीच्या २४ तासांतील करोनाच्या नकारात्मक चाचणीचा अहवालही सोबत बाळगावा लागणार आहे,’ असं ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन’ने स्पष्ट केलं आहे.

भारतात काय आहे करोनाची स्थिती?

भारतात गेल्या २४ तासात १ हजार २५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या १५ हजार ३७८ इतकी झाली आहे. तसंच भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासात १ हजार ७०५ करोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ४,२४,८५,५३४ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here