मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देशात ‘उत्सवी’ वातावरण हवं आहे, या शिवसेनेच्या आरोपाला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संकटाच्या काळात देशातील जनतेचं मनोबल वाढवण्याचं काम करणाऱ्या पंतप्रधानांच्या भूमिकेवर राजकीय अभिनिवेषातून टीका-टिप्पणी करणं अत्यंत दुर्दैवी आहेच, पण करोनाविरुद्धच्या लढ्याची तुलना ‘पानिपत’शी करणं त्याहून चुकीचं आहे. त्यामुळं लोकांमध्ये नैराश्याची भावना पसरू शकते,’ असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून आज मोदींच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगची शिस्त मोडली. रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या. मोदींची भूमिका लोकांपर्यंत नीट पोहोचत नसावी किंवा मोदींनाच देशात असं वातावरण हवं असावं,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘करोना युद्धाची स्थिती पानिपतसारखी होऊ नये,’ अशी अपेक्षाही अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेनेची ही टीका खेदजनक असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेनेची भूमिका मांडणारे हे स्वत: राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. संसदेत लोकप्रतिनिधी आहेत. संसदेतील सर्वोच्च नेत्यानं देशातील परिस्थितीच्या विरोधात लढण्यासाठी एखादी भूमिका मांडली असेल तर त्यावर त्यांनी शंका घेणं दुर्दैवी आहे. देशात भयंकर परिस्थिती असताना त्यांनी असं बोलणं संयुक्तिक नाही. करोनाविरुद्धच्या लढ्याची पानिपतशी तुलना करून एक अपयशाची भावना राऊत यांनी पसरवली आहे. त्यामुळं जनतेमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे,’ अशी भीती दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

‘देश संकटाच्या परिस्थितीतून जात असताना देशवासीयांना धीर देण्याची आवश्यकता आहे. अशावेळी उणीदुणी काढली जात आहेत. दुसऱ्यांवर टीका करताना राज्यात वैद्यकीय सेवेची स्थिती काय आहे याकडंही त्यांनी लक्ष द्यायला हवं,’ असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here