मुंबई : मोठ्या पडद्याइतकीच प्रसिद्धी छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांनाही मिळत असते. अनेक मालिका घराघरात लोकप्रिय असल्यानं त्याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा प्रवास छोट्या पडद्यावरून सुरू केला. त्यानंतर ते मोठ्या पडद्यावर झळकले. असं असलं तरी मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांना छोट्या पडद्याचं आजही आकर्षण आहे. त्याची भुरळ आहे.

सर्वांसमोर संजना, अनिरुद्धनं केला अरुंधतीचा अपमान; मालिकेत ट्विस्ट

छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. सातत्यानं येणारे नवीन विषय, प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक मोठमोठे कलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवताना दिसून येत आहेत. आणि यामध्ये त्यांना यशदेखील मिळत आहे. मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या कलाकारांमध्ये श्रेयस तळपदे, स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, सचिन खेडेकर यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. हे सर्वजण छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. त्याचप्रमाणे आजमितीला मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत.

श्रेयस तळपदे


मराठी आणि हिंदी सिनेमा विश्वामध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसत आहे. झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत श्रेयस यशवर्धन चौधरी ही भूमिका साकारत आहे. ही मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ती खूपच लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री आणि छोट्या परीचा गोड अभिनय यामुळे मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेतून श्रेयस तळपदेने अनेक वर्षांनंतर मालिकांमध्ये पुनरागमन केलं होतं. या मालिकेच्या एका भागासाठी श्रेयस तळपदे ४० ते ४५ हजार रुपये इतकं मानधन घेत आहे.


स्वप्नील जोशी


स्वप्नील जोशी हा मराठीमधील सर्वाधिक लाडका आणि लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. स्वप्नीलनं त्याच्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधूनच केली. त्यानंतर त्यानं अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. काही वर्षांपूर्वी झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट, त्यानंतर स्टार प्रवाहवरील जीवलगा ही मालिका त्यानं केली होती. त्यानंतर आठ वर्षांनतर स्वप्नील पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला आहे. झी मराठीवरून प्रसारित होणारी तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा तुळसकर ही जोडी दिसत आहे. या मालिकेमध्ये स्वप्नीलनं सौरभ पटवर्धन ही भूमिका साकारत आहे. तर शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षित साकारत आहे. या मालिकेच्या एका भागासाठी स्वप्नील ६० ते ७० हजार रुपये इतकं मानधन घेतो.

आता कंगना रणौतच्या ‘लॉकअप’मध्ये मिलिंद सोमण होणार कैदी? घेणार वाईल्ड कार्ड एण्ट्री

मुक्ता बर्वे


मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेनं तिची ओळख निर्माण केली आहे. अनेक सिनेमे, नाटके मुक्तानं केली आहेत. त्याचप्रमाणे मुक्तानं ज्या मालिकांमध्ये काम केलं आहे, त्या देखील लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामध्ये घडलंय बिघडलंय, पिंपळपान, श्रीयुत गंगाधर टिपरे, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, रुद्रम यांचा समावेश आहे. त्यानंतर मधे काही वर्ष मुक्ता छोट्या पडद्यापासून लांब होती. परंतु सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून ती उमेश कामतबरोबर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकली. या मालिकेत मुक्तानं मीरा देसाई ही भूमिका साकारली होती.

उमेश कामत


मराठी नाटक, सिनेमा विश्वात उमेशनं त्याच्या अभिनयानं प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. उमेशनं अजूनही बरसात आहे या मालिकेतून प्रदीर्घ कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.


सचिन खेडेकर

सचिन खेडेकर


मराठी, हिंदी सिनेमाविश्वात सचिन खेडेकर देखील आपल्या अभिनयानं ठसा उमटवला आहे. मोठ्या पडद्यावर काम करत असताना सचिननं ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्याशी ऋणानुबंध कायम जपले आहेत. या कार्यक्रमाचे आतापर्यंत चार पर्व झाली आहेत. आता लवकरच पाचवं पर्व सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या एका भागासाठी सचिन खेडेकर ५० लाख रुपये मानधन घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here