शहरात सोमवारी करोनाचा तिसरा रुग्ण आढळून आला. कसबा बावडा येथील एका ६३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर सीपीआरमधील विशेष करोना कक्षात उपचार सुरू होते. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणीसाठी सोमवारी रात्री सीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यातील तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांसह इतर १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या अनुषंगाने कसबा बावडा परिसर तातडीने सील करण्यात आला असून, सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्या महिलेने सातारा, कोरेगाव तालुक्यातील बनवडे, असा प्रवास केला होता. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सेवा रुग्णालय तसेच पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. तिच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा कसून शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
तपासणीसाठी लोकांनी पुढे यावे
शहरात यापूर्वी दोन करोनाबाधित रुग्ण होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता करोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. संबंधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली होती, त्यांनी स्वतःहून आवश्यक त्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन, आरोग्य विभागाला माहिती द्यावी. त्यामुळे संभाव्य बाधितांची संख्या आटोक्यात आणता येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचानक येणारा ताप, खोकला, घसा दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times