अकोला : हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहत आलोय…. ते म्हणजे ‘दोन भाऊ कुंभमेळ्या हरवण्याचं’… अकोला जिल्ह्यातील आगर गावात ही ‘रील लाईफ स्टोरी’ मात्र ‘रियल’मध्ये घडली आहे. आगर गावातील शिरसाट कुटुंबाच्या आयुष्यात हा अगदी खरा-खुरा सीन उभा राहिला आहे. तब्बल 42 वर्षांपूर्वी हरवलेला त्यांचा भाऊ आता घरी परत आला आहे.

उत्तम शिरसाट हा आगर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शंकर मिराजी शिरसाट यांचा दत्तक मुलगा. उत्तम यांचं शिक्षणही पदवीपर्यंत झालेलं आणि लग्नही झालेलं. या सुखवस्तू कुटुंबात सर्व सुरळीत सुरु होतं. मात्र, आई गंगूबाईच्या निधनानंतर उत्तम मानसिकदृष्ट्या ढासळला होता. अन् यातच त्याने 1980 साली घर सोडलं.

त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने किंवा कोणतीही खबरबात न मिळाल्याने कुटुंबात चिंतेचं वातावरण होतं. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. राज्यात, देशभरात त्याचा शोध घेण्यात आला. परंतु कुठेच पत्ता लागला नव्हता. अखेर उरळ पोलीस स्टेशन आणि आकाशवाणीवरुन मुलगा हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. मुलगा अनेक वर्षे न मिळाल्याने शोधमोहीम थांबली होती.

मात्र, तेव्हा न सापडलेला उत्तम काल (29 मार्च) घरी आला. त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगा देखील होते. भाऊ परतल्याने घरातील सर्वांच्याच भावना शब्दांच्या पलिकडच्या आहेत. एवढ्या वर्षांनी भावाला पाहून त्यांची बहिण विजया बावस्कर आणि भाऊ भाऊराव सिरसाट यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

घरातून निघून गेलेला उत्तम पुढे नाशिकला गेला. तिथेच काम करु लागला. अन् तिथेच त्याचं लग्नही झालं. आता त्याच्या दोन मुलींचंही लग्न झाली आहेत. तर मुलगा बारावीला आहे. तो भूतकाळातील अनेक घटनांबद्दल अनभिज्ञ असल्याचं सांगतो. मात्र, नवं गणगोत मिळाल्याने पत्नी, मुलाच्या आनंदाला पारावार नाही. 

माणसाचा आयुष्यच एखाद्या चित्रपटासारखं… उत्तम सिरसाट यांच्यासारख्यांच्या आयुष्यावरुनच खऱ्या चित्रपटाच्या कथा आकाराला येतात. आता त्यांच्या आयुष्याच्या चित्रपटातही आनंदाचे रंग भरले जावेत हिच सदिच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here