मालिकेच्या कथानकात आतापर्यंत अरुंधती आणि आशुतोषच्या गाण्यांच्या अल्बमचं प्रकाशन होतं. अरुंधतीचा होणारा उत्कर्ष पाहून संजना आणि अनिरुद्धचा चांगलाच जळफळाट झाला आहे. अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळी संजना अरुंधतीचा जाहीर अपमान करण्यासाठी काही लोकांना हाताशी धरते. या लोकांना पैसे देते आणि ती अरुंधतीच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत प्रश्न विचारायला सांगते. परंतु तिचं हे बिंग सगळ्यांसमोर येतं. संजनानं अरुंधतीचा अपमान केल्यामुळे आशुतोषही संतप्त होतं. अरुंधतीच्या सांगण्यावरून तो संजनाला कामावरून काढून टाकतो. हे सहन न झाल्यानं संजना आणि अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीचा अपमान करतात. परंतु अरुंधती संजनाला चोख उत्तर देत तिची बोलती बंद करून टाकते.
मालिकेच्या आगामी कथानकात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात अल्बमच्या प्रकाशानंतर अरुंधती देशमुखांच्या घरी तिच्या सासूला म्हणजे कांचनला भेटण्यासाठी खास येते. परंतु त्याच वेळी कांचन घरातल्यांना म्हणते की, ‘अरुंधतीनं तिचा हक्क सोडण्याची गरज नव्हती. परंतु तिनं सोडला. सगळ्यांना लाथ मारून ती निघून गेली. म्हणून अनिरुद्ध तिला बोलला. कधीही भलं होणार नाही तिचं…’ असं म्हणत तिचा अपमान करते. त्याच वेळी तिथं आलेली अरुंधती हे सगळं बोलणं ऐकते.
कांचनचं हे बोलणं आप्पांना सहन होत नाही. ते कांचनला अडवण्याचा प्रयत्न करतात.परंतु कांचन आप्पांचा देखील अपमान करते. आप्पा तिला म्हणतात की, ‘यापुढे जर तू अरूंधतीला काय म्हणालीय तर मी तुला हाताला धरून घरातून बाहेर काढेन.’ यावर कांचन आप्पांना म्हणते की, ‘तुम्ही कोण मला घरातून बाहेर काढणारे ? हे घरच तुमचं नाही. हा बंगला अनिरुद्धनं उभा केला आहे. तुमचं इथं काय आहे..’ हे सगळं अरुंधतीसमोर सुरू असतं. हे पाहून अरुंधतीला वाईट वाटतं व ती निघून जाते. तेव्हा आप्पा तिला थांबवतात व म्हणतात, ‘मी सुद्धा तुझ्यासोबत येतो.’ कांचनने केलेल्या अपमानानंतर आप्पांनी देखील घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आप्पांना देशमुख कुटुंब घर सोडण्यापासून थांबवू शकेल का ? शिवाय आप्पा घरातून केल्यानंतर कांचन देशमुखांच्या घरात कशी राहणार हे देखील पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.