यावेळी रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीत केवळ महामंडळांवरील नियुक्त्यांवरूनच नाराजी नाही. तर निधीवाटपाच्या मुद्द्यावरूनही तीन पक्षांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार येणं तर लांबच राहिलं पण आघाडी टिकवणंही अवघड आहे, असे दानवे यांनी सांगितले. ही बाब आता शिवसेना आणि काँग्रेसच्या लक्षात येऊ लागली आहे. शिवसेना केवळ मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी राज्यभरातील आमदारांची नाराजी ओढवून घेत आहे. त्यामुळे कधी ना कधी महाविकास आघाडीत स्फोट होईलच, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.दरम्यान, आज मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची फोडाफोडी करण्याच्या तयारीत; बावनकुळेंचा आरोप
शिवसेनेतील ९० टक्के आमदार नाराज आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नजर टाकल्यास त्यामध्ये मंत्री आणि त्यांच्या जवळच्या आमदारांनाच झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे दिवस पुढे सरकतील तशी महाराष्ट्रातील राजकीय असुरक्षिता वाढणार आहे. मतदारसंघात विकासकामे न झाल्याने आमदारांना असुरक्षित वाटेल. याच कारणामुळे सध्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. महाविकास आघाडीत केवळ राष्ट्रवादी खूश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांना स्वयंपूर्ण करत आहे, असा दावा बावकुळे यांनी केला.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची नाराजी लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने १०० प्लस आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला किती निधी मिळाला बघा, असे सांगतील. या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.