साखरतर अकबर मोहल्ला येथील ५२ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. या महिलेच्या घराशेजारी मुंबई येथून आलेले जमातीचे काहीजण वास्तव्याला आहेत. हे सर्वजण क्वारंटाइन असून त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळून आली नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले. या महिलेच्या कुटुंबात १५ जण आहेत. यापैकी अगदी जवळच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात आणून तपासणी करण्यात येणार आहे.
करोनाबाधीत महिला काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी आली होती. ज्या डॉक्टरकडे उपचारासाठी महिला गेली होती त्या डॉक्टरसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. हॉस्पिटलचा सीसीटीव्ही तपासून ज्या कर्मचाऱ्यांचा त्या महिलेसोबत संपर्क आला आहे त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, साखरतर सील करण्यात आले असून तीन किलोमीटर परिसरातील शिरगाव, काळबादेवी आणि बसणी ही गावे लवकरच सील करण्यात येणार आहेत. या संपूर्ण परिसरात फवारणी करण्यासह ग्रामस्थांची तपासणी देखील करण्यात येणार आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines