सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या १२ प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असेल. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे असेल. तर धुळे आणि नंदूरबारमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड आणि जालना या लोकसभा मतदारसंघांच्या मोर्चेबांधणीची कामगिरी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत भाजपचे नेते महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तर मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भाजपकडून पोलखोल अभियान राबवले जाणार आहे. या सगळ्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय हवा चांगलीच तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
आम्ही एकदा धोका खाल्लाय वारंवार खाणार नाही: फडणवीस
उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंत भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आम्ही एकदा धोका खाल्लाय, वारंवार खाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.