नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या नेतृत्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगवान चर्चा सुरू झाली असून या पदासाठी विविध नेत्यांची नावे पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य करत काँग्रेसविरोधात हल्लाबोल केला आहे. ‘काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आणि यूपीएचं अध्यक्षपद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसनं यूपीएच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले नाही तर असा पुढाकार घेणाऱ्या अन्य कोणाकडे तरी यूपीएचं नेतृत्व जाईल असं वातावरण सध्या देशात आहे. एनडीए कुणाची खासगी मालमत्ता नाही, तशी यूपीए देखील कोणाची खासगी मालमत्ता नाही,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On Congress Leadership)

‘काँग्रेसने २०२४ ची निवडणूक लक्षात घेऊन यूपीएच्या जिर्णोद्धाराची तयारी करायला हवी होती. मात्र काँग्रेसकडून तसं होताना मला तरी दिसत नाही. यापुढे जे नेते यूपीएचं नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतील त्यांना इतर भाजपविरोधी पक्ष पाठिंबा देतील,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे विरोधी पक्षांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत आणि देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावं, यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत, असंही राऊत म्हणाले.

BIMSTEC Summit: आंतरराष्ट्रीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह, ‘बिमस्टेक’समोर पंतप्रधान मोदींचा सवाल

‘उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार’

‘भाजपला एकट्याच्या जीवावर बहुमत असल्याने त्यांनी एनडीए भंगारात काढली. त्यामुळे शिवसेनेसह अकाली दल आणि इतर पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भविष्यात एनडीएतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी एकत्र यावं, असं अकाली दलाचं म्हणणं आहे आणि मी मुंबईत या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे,’ अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र असताना संजय राऊत यांनी यूपीए नेतृत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केल्याने वादाची ठिणगी पडणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

तपास यंत्रणांच्या कारवाईवरून हल्लाबोल

केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या कारवायांवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ‘ज्यांच्याविषयी आरोप केले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, हा एक गंमतीचा विषय आहे. आम्हीसुद्धा अनेक संदर्भात व्यवस्थित माहिती जिथे द्यायची तिथे दिली आहे, पण आम्ही दिलेल्या माहितीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली नाही. आताचा एका वकिलाच्या घरावर नागपुरात ईडीने धाड टाकली. मला नागपुरातून अनेकांनी फोन केले. भविष्यात नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण ते त्यांचे वकिल आहेत. हे सर्व कायद्याने होत आहे कर नाही त्याला डर कशाला असं विरोधक बोलतील. मग तुमच्याविरोधात पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई का नाही? जर कोणी काही जुने अपराध केले असतील तर कारवाई व्हायला हवी. कायदा सर्वांना समान आहे, पण महाराष्ट्राच्या बाबतीत हा तराजू एका बाजूने झुकलेला दिसतो,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधी पक्ष झुंडशाही करत असून या यंत्रणांचा वापर पाळलेल्या गुंडांप्रमाणे केला जात आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here