सुरज कांबळे

करोना निर्बंध खुले झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नाट्यगृहं पूर्ण क्षमतेनं खुली झाली. ५० टक्क्यांत सुरू असताना नाटकं हाऊसफुल्ल होत होती. १०० टक्के आसनक्षमतेसह परवानगी मिळाल्यावर खऱ्या अर्थानं नाटक हाऊसफुल्ल होण्याच्या प्रतीक्षेत निर्माते आहेत. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढत असून, एकदा परीक्षा संपल्या की लवकरच हाऊसफुल्लचे फलक नाट्यगृहांवर झळकू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

करोनाचा काळ रंगभूमीसाठी खूप खडतर होता. बंद पडलेल्या नाट्यप्रयोगांमुळे नाटकांवर अवलंबून असणारे कलाकार आणि बॅकस्टेज कलाकारांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ५० टक्के आसनक्षमतेसह नाट्यगृहं सुरू असताना काही नाट्यनिर्मात्यांनी नवी नाटकं आणण्याचं धाडस दाखवलं. नुकत्याच रंगलेल्या मटा सन्मान सोहळ्यात अशाच काही निवडक नाटकांना गौरवण्यातही आलं. त्याबरोबर जुनी नाटकंही नव्यानं रंगभूमीवर दाखल झाली होती. अनेक अडचणी, आव्हानांवर मात करत नाट्यसृष्टी हिंमतीनं प्रयोग करत होती. प्रेक्षक नाटकांना चांगला प्रतिसाद देत होते. अगदी नव्याकोऱ्या नाटकांनाही प्रेक्षक येऊ लागले. त्यामुळे नाटकांना हळूहळू गर्दी होताना दिसू लागली. आता निर्बंध शिथिल होऊन महिना होत असताना नाटकांना मिळणाऱ्या बुकिंगचं चित्र आशादायी आहे.

‘संज्या छाया’, ‘खरं खरं सांग’, ‘मी स्वरा आणि ते दोघे’, ‘कुर्रर्रर्र’, ‘३८ कृष्ण व्हिला’, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, ‘वाकडी तिकडी’, ‘हौस माझी पुरवा’, ‘वन्स मोअर तात्या’, ‘सुंदरा मनात भरली’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘वासूची सासू’, या नव्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत आहेत. त्याबरोबरीने ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘सही रे सही’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तू म्हणशील तसं’ या जुन्या नाटकांचे प्रयोगही वेगाने होत आहेत. त्यांना प्रेक्षक गर्दी करत आहेत. ‘आमने सामने’ हे नाटक ९ एप्रिलपासून येणाार आहे. याशिवाय आणखी काही नाटकंही रंगभूमीवर पुन्हा दाखल होणार असल्याचं कळतंय.

‘नाटकाच्या बाबतीत काही गणितं ठरलेली असतात. ती गणितं मुळात प्रेक्षकांवरच अवलंबून असतात. प्रेक्षक नसेल तर नाटक कसं होणार? करोना काळातलं चित्र आता पालटलं आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा नाट्यगृहात येतोय. नाटकांचं बुकिंग भरलेलं असतं. नाटकांना येणारा प्रेक्षक हळूहळू वाढतो आहे. यामुळे आता पुन्हा नवीन नाटक, नवीन संहिता यांची गरज भासू लागली आहे. फक्त तरुण प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येनं नाट्यगृहाकडे कसा वळेल यावर अधिक भर द्यायला हवा’, असं नाट्यनिर्माते चंद्रकांत लोकरे म्हणतात. तर, ‘नाटकाची संहिता आणि कलाकार यांची योग्य सांगड घातली गेलेली असली की प्रेक्षक नाटकाला येतोच. एका मोठ्या कालावधीनंतर नाट्यसृष्टी पुन्हा उभी राहत असताना नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. नाटकाला प्रेक्षक येतोय हे महत्त्वाचं आहे. रंगभूमीवर नाटकांची संख्या वाढत असताना नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्यासुद्धा आणखी अशीच वाढावी ही अपेक्षा आहे’, असे सूत्रधार शेखर दाते यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here