नागपूर: करोनाची लागण झालेल्या सतरंजीपुरा येथील एका ज्येष्ठाच्या मृत्यूमूळे निर्माण झालेली दहशत कमीही होत नाही तोच अशी लक्षणे आढळलेल्या आणखी एका करोनासदृष्य रुग्ण असलेल्या गर्भवती महिलेचे मंगळवारी निधन झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग प्रसूती शास्त्र विभागात ही महिला उपचारासाठी आली होती. त्यामुळे आता मेयो पाठोपाठ मेडिकलमध्येही भयाचे वातावरण आहे.

आठ महिन्यांची ही गर्भवती माता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील होती. तिला मंगळवारी दुपारी करोनासदृष्य आजाराची लक्षणे आढळल्याने मेडिकलच्या करोना वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मयोत पाठविण्यातही आले. त्याचा अहवाल येण्याआधीच ही गर्भवती महिला दगावल्याने मेडिकलचे प्रशासन हादरले आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय आता अहवाल आल्यानंतर आणि पुढे शवविच्छेदन केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील अवघ्या वीस वर्षांची ही महिला होती. या गर्भवती महिलेवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम ती वॉर्ड क्रमांक २२ मध्ये उपचार घेत होती. या उपचारादरम्यान तिला करोनाची लक्षणे आढळल्याने तिला तातडीने मंगळवारी स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र विभागातून करोना वॉर्डात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच तिच्या घशातील स्रावाचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी मेयोत पाठवण्यात आले. मात्र अहवाल येण्याआधीच या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवला आहे. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता नमुन्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

स्त्रीरोग प्रसूती विभागात भयाचे वातावरण

या गर्भवती महिलेचा करोना तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. मात्र तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून ज्या स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागात उपचार सुरू होते, तेथील सर्व कर्मचारी आणि रुग्णांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तिचा अहवाल सकारात्मक आल्यास मेडिकलमधील स्थिती बिकट होऊ शकते. वॉर्ड क्रमांक २२ मध्ये ही महिला गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होती. त्यामुळे संपर्कातील अनेक गर्भवती माता, परिचारिका तसेच नातेवाईकांवर विलगीकरणाची वेळ येऊ शकते.

खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू
या घडामोडीत कटनी येथील आणखी एकाचा करोना सदृष्य आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हा रुग्ण त्रीमूर्ती नगर चौकाजवळील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या मृत्यूनंतर हा मृतदेह देखील मेडिकलच्या शवविच्छेदनगृहाकडे पाठविण्यात आला आहे. मेडिकलमधील गर्भवती महिला आणि या रुग्णाचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या खासगी रुग्णालयातही चिंतेचे वातावरण आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here