बीजिंग : चीनभोवती करोनाचा विळखा आणखी घट्ट झाला असून देशातील सर्व ३१ प्रांतांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याने चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाईसह तब्बल ५ शहरांत लॉकडाऊन करण्यात आले. शांघाई शहरात निर्बंध कडक करण्यात आल्याने बँकेचे व्यवहार आणि इतर कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी तब्बल २० हजार बँक कर्मचारी कार्यालयात राहून काम करत आहेत. सरकारकडून या कर्मचाऱ्यांना अन्नपदार्थाचा पुरवठा करण्यात येत आहे. (Coronavirus In China Update)

जगभरातील विविध देशांमध्ये मध्यंतरी करोना संसर्ग आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना विषाणूला रोखण्यासाठी चीनने झीरो कोविड पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न केला होता. या अंतर्गत चीनने करोना रुग्ण आढळलेल्या परिसरात तातडीने निर्बंध लादले. परंतु चीनची ही रणनीतीही अपयशी ठरली असून या विषाणूच्या प्रादुर्भावाने चीनला आता जेरीस आणल्याचं पाहायला मिळत आहे.

PM Imran Khan: इम्रान खान यांना ‘कपिल शर्मा शो’चाच आसरा, माजी पत्नी रेहाम खान यांचा टोला

‘रुग्णांना खाटाही मिळणं झालं अवघड’

संसर्ग वेगाने वाढल्याने चीनमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे तब्बल १२ हजार सरकारी रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणंही अवघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर चीनची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, चीनमध्ये वृद्ध व्यक्तींच्या लसीकरणाचं प्रमाण अवघं ५२ टक्के असून या कारणामुळेही देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here