राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले जाते. राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांना कमी निधी मिळतो. तसेच पक्षातील वरिष्ठ मंत्री आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. त्यामुळे हे आमदार आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापुढे आणखी काय गाऱ्हाणे मांडणार, हे पाहावे लागेल.
नितीन राऊत यांच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराज?
काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या पत्रात अनेक समस्या उपस्थित केल्या आहेत. राज्य सरकारमधील काँग्रेसचे अनेक मंत्रीच आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. विशेषत: उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कारभारावर हे आमदार असमाधानी आहेत. तसेच काँग्रेसचे अनेक पालकमंत्री सक्रिय नसल्यामुळे त्याठिकाणी बदल व्हावा, अशी मागणीही नाराजांच्या गटाकडून करण्यात आली आहे.
पटोलेंनी भाजपवरच बॉम्ब टाकला
काँग्रेसचा कोणताही आमदार नाराज नाही. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत. मात्र भाजपमध्ये सर्वच आलबेल आहे का? त्यांचेही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि याबाबत योग्यवेळी माहिती देऊ, असा दावा नाना पटोले यांनी केला.