करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना करता येतील, याचं पत्र सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलंय. केंद्र सरकार, सरकारी संस्था आणि कंपन्यांकडून टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्र आणि ऑनलाइन अशा सर्व माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती पुढील दोन वर्षांसाठी पूर्णपणे बंद कराव्यात, असं सोनिया गांधींनी म्हटलंय.
प्रसार माध्यमांवर दोन वर्षांसाठी जाहिरात बंदी करण्याची मागणी अतिशय चुकीची आहे. सोनिया गांधींनी केलेल्या या सूचनेवर एनबीएकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी पत्रकात म्हटलं आहे.
करोनामुळे सर्वत्र रोगराईची स्थिती असताना माध्यमांचे प्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून आवश्यक ती माहिती देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. अशा स्थितीत सोनिया गांधी यांनी केलेली सूचना ही माध्यमांचे खच्चीकरण करणारी आहे, असं रजत शर्मा यांनी सांगितलं.
मंदीमुळे वृत्त वाहिन्यांचे उत्पन्न आधीच घटले आहे. त्यातच करोना व्हायरसमुळे घोषित झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनने उद्योग, व्यवसाय ठप्प असल्यानं माध्यमांसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. माध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून त्यांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. यामुळे माध्यमांवर जाहिरात बंदी करण्याची ही योग्य वेळ नाही असे केल्यास ही मनमानी ठरेल, असं रजत शर्मा म्हणाले. सशक्त आणि निर्भीड माध्यमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेली माध्यमांवरील जाहिरात बंदीची सूचना सोनिया गांधींनी मागे घ्यावी, अशी मागणी रजत शर्मा यांनी पत्रातून केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times