Russia Ukraine News: Shocking News From Ukraine On The 38th Day Of The War With Russia | रशियाच्या हल्ल्यानंतर ३८ व्या दिवशी युक्रेनमधून धक्कादायक माहिती
कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध ३८ व्या दिवशीही धगधगत असून कोणताही देश माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं दिसत आहे. रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख होण्याच्या मार्गावर असून हळूहळू देशातील दाहक स्थिती समोर येऊ लागली आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनमधील तब्बल १५ विमानतळे उद्ध्वस्त केली असल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. (Russia Ukraine War Update News)
रशिया-युक्रेन युद्धामध्ये सैनिकांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनमधील १ हजार २३२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आली आहे. तसंच या युद्धात १ हजार ९३५ लोक जखमी झाले आहेत.
काय म्हणाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष?
रशियाकडून जोरदार हल्ले सुरू असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाला संबोधित केलं आहे. ‘आतापर्यंत जे झालं आहे ते विसरून आपल्याला भविष्याबाबत विचार करावा लागेल. या युद्धानंतर युक्रेन कसा असेल? आपलं जीवन कसं असेल? याचा विचार करावा लागेल आणि ही आपल्या भविष्याची लढाई आहे,’ असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.