म. टा. प्रतिनिधी, मुंबई

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत करोनाचे सात रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सायंकाळी धारावीला भेट दिली.

त्यांनी या भागात केवळ करोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. क्वारंटाइनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाडदेखील उपस्थित होत्या. आरोग्यमंत्री टोपे यांनी धारावीमध्ये अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण आणण्याकरिता अधिक कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

धारावी भागात ५० खाटांचे साई रुग्णालय केवळ करोना उपचारासाठी घोषित केले असून तेथे व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ३५० खाटांची अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची पाहणीही त्यांनी केली. अनेक संस्था, दानशूर व्यक्तींकडून या भागात धान्य, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.

स्वच्छतागृहांचे सातत्याने निर्जंतुकीकरण

धारावी पोलिस ठाण्यात आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतली. संसर्गाचा धोका वाढू नये, याकरिता गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच त्यासाठी कडक अमंलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याभागात असलेल्या सार्वजनिक स्वचछतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकरणाची प्रक्रिया राबवावी अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here