मुंबई: मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे हे शिवाजी पार्कवरील सभेतून मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार राज ठाकरे अयोध्येला जाणारही होते. परंतु, नंतरच्या काळात करोना निर्बंधांमुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा बारगळला होता.
राज ठाकरे राज्यपालांवर बरसले; वादग्रस्त वक्तव्यावरून केली घणाघाती टीका
मात्र, आता महाराष्ट्रासह देशातील करोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळे राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जातील, अशी अटकळ बांधली जात आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे याबाबतची घोषणा करू शकतात. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठीचा अजेंडा उचलून धरला होता. परंतु, सुरुवातीच्या काळातील कामगिरी वगळता निवडणुकीच्या मैदानात राज ठाकरे यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेऊन वाटचाल करण्याचे ठरवले होते. त्यामुळे अलीकडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदुत्वाचा विषय उचलून धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा मनसेसाठी गेमचेंजर ठरू शकतो. अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख प्रस्थापित करण्यात मनसेला मदत होऊ शकते.
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर डागली तोफ
तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे मनसेला हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी राजकीय स्पेस मिळाली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा प्रचार मतदारांना भावल्यास राज्यातील आगामी महानरपालिका निवडणुकांमध्ये मनसेच्या मतदारांची संख्या वाढू शकते. त्यादृष्टीने राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त जाहीर करणार का, हे पाहावे लागेल.

राज ठाकरे नेमके काय बोलणार?

या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमके काय बोलणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here