मुंबई: ‘करोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारला पैसा हवा आहे. तसा तो महाराष्ट्रातील ठाकरे सरकारलाही हवा आहे. महाराष्ट्राने हा निधी कसा उभारावा, असा प्रश्न उपस्थित करतानाच, ‘मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील २५ टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘परदेशातील काळा पैसाही या निमित्तानं परत आणा,’ असा चिमटाही शिवसेनेनं भाजपला काढला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आलं आहे. त्यामुळं अर्धव्यवस्था ठप्प झाली आहे. दुसरीकडं, अभूतपूर्व अशा युद्धामुळं खर्च वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं खासदारांचे वेतन, भत्ते कपात सुरू केली आहे. अन्य ठिकाणांहूनही निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केंद्राच्या या प्रयत्नांचं स्वागत करण्यात आलं आहे. त्याचवेळी, राज्यासाठी केंद्राकडं काही मागण्या करतानाच अग्रलेखातून महाराष्ट्र भाजप करत असलेल्या राजकारणावरही बोट ठेवण्यात आलं आहे.

आई जगदंबा त्यांना महाराष्ट्रनिष्ठेची सुबुद्धी देवो!

महाराष्ट्रातील बहुतांश नेते व खासदारांनी त्यांचा निधी राज्याच्या साहाय्यता निधीत देण्याऐवजी पंतप्रधान फंडात जमा केला आहे. त्यावरून शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील भाजप महामंडळाने त्यांचा निधी केंद्रात वळवला आहे. त्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीवर विश्वास नाही. घटनात्मक पदावर असलेले राज्यपालही दिल्लीच्याच मार्गाने गेले आहेत. हे असे अतरंगी वर्तन काँग्रेसच्या नेत्यांनी व राज्यपालांनी केले असते तर भाजपने महाराष्ट्रात तांडव केले असते. आई जगदंबा त्यांना लवकरच सद्वर्तनाची, महाराष्ट्रनिष्ठेची सुबुद्धी देईल,’ अशी सणसणीत टीका अग्रेलखातून करण्यात आली आहे.

सैन्य पोटावर चालते!

जनतेला एकवेळच्या जेवणाचा त्याग करण्याचं आवाहन करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही शिवसेनेनं टोला हाणला आहे. ‘करोनाच्या लढाईत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असायलाच हवा आणि आपापल्या मगदुराप्रमाणे त्याने मदत केली पाहिजे, हे खरेच आहे. पण देशातील २० टक्के जनता एकवेळचेच जेवते. ते प्रमाण आता वाढेल. करोनाचे युद्ध जनताच लढणार आहे व जनताच त्यात मरणार आहे. सैन्य पोटावर चालते. करोनाविरुद्धच्या युद्धात जनताच सैन्य असेल तर तिला उपाशी कसे ठेवायचे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

अग्रलेखातील काही मुद्दे:

>> सहा-सात वर्षांपूर्वी देशात इतका पैसा होता की, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याची बतावणी झाली होती. परदेशातील ७० हजार कोटी इतका काळा पैसा हिंदुस्थानात आणायची तयारी सुरू होती. हा पैसा आता तरी आणला जाईल असे वाटत होते, पण सरकारने काय केले?

>> मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील २५ टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत. म्हणजे, मोदींच्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनाही कोरोनाचे युद्ध लढता येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here