२०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असे चित्र होते. मात्र, निकाल लागल्यानंतर शिवसेना विशेषत: उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची टूम काढली. यासंदर्भात अमित शाह यांच्याशी एकांतात बोलणे झाले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मग उद्धव ठाकरे यांनी ही गोष्टी जाहीरपणे कधी का सांगितली नाही? उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्यात युतीचे सरकार आल्यास भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कोणताही आक्षेप का घेतला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एके दिवशी आम्ही सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळा. पळून कोणाबरोबर आणि लग्न कोणाबरोबर काहीच कळेनासे झाले होते. मग एक आवाज आला आणि हे लग्न थांबले. त्यानंतर दोघेही हिरमुसून घरी गेले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत असा प्रकार पाहिला नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी २०१९च्या सत्तानाट्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपला टोला लगावला.
उत्तर प्रदेशचा निकाल पाहून चांगलं वाटलं: राज ठाकरे
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून मला बरे वाटले. उत्तर प्रदेशातील जनता विकासाच्या मुदद्यावरून राजकारण करत आहे, हे पाहून चांगले वाटले, असे राज ठाकरे यांनी म्हटले.