इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan News) यांनी शेवटच्या क्षणी अनोखा डाव टाकला आहे. संसदेचे उपसभापती कासिम खान सुरी यांनी सरकारविरोधात सादर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावत विरोधकांना धक्का दिला. परदेशी कटातून हा प्रस्ताव आणण्यात आला असल्याचा आरोप करत कासिम खान सुरी यांनी या प्रस्ताव फेटाळला आणि मतदान घेण्याचं टाळलं आहे. त्यामुळे इम्रान खान यांना बाजूला करत सत्तेवर येण्याचं विरोधकांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. (No Confidence Motion Live Updates)

अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं. ‘परकीय शक्तींकडून कट रचून सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र आता अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून मी याबद्दल पाकिस्तानी जनतेचं अभिनंदन करतो. संसद विसर्जित करावी, असा सल्ला मी आधीच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेने पुन्हा निवडणुकांची तयारी करावी,’ असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

pakistan live update : अविश्वास प्रस्ताव विदेशी षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप

संसद विसर्जित करण्याची विनंती राष्ट्रपतींकडून मान्य

पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकस्तानची संसद विसर्जित करण्याची केलेली मागणी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. देशात पुढील ९० दिवसांमध्ये निवडणुका होतील, असं इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फारूख हबीब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याची कृती संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाने केला आहे. हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने विरोधी पक्षाचे नेते सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता निर्माण झाली असून पुन्हा निवडणुका घेण्याची नामुष्की ओढावल्याने पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here