इंद्रप्रस्थ गॅसने आज सीएनजी गॅसच्या किंमती प्रति किलो २.५ रुपयांची वाढ केली. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजी प्रति किलो ६४.११ रुपये इतका झाला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा भाव ६६.६८ रुपये झाला आहे. मुझ्झफरनगर, मेरट आणि शामली येथे सीएनजी ७१.३६ रुपये इतका झाला आहे.
गुडगावमध्ये सीएनजीचा भाव ७२.४५ रुपये, रेवडीमध्ये ७४.५८ रुपये, कर्नालमध्ये ७२.७८ रुपये आणि कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये ७५.९० रुपये इतका सीएनजीचा दर आहे. अजमेर, पाली आणि राजसामंदमध्ये सीएनजी ७४.३९ रुपये इतका झाला आहे. यापूर्वी कंपनीने १ एप्रिल २०२२ रोजी सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात वाढ केली होती. १ एप्रिल रोजी सीएनजी ८० पैसे आणि पाईप गॅसचा दर ५ रुपयांनी वाढला होता. यामुळे दिल्लीत पाईप गॅसचा दर ४१.६१ रुपये प्रति स्टॅंडर्ड क्युबिक मीटर इतका वाढला आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या १३ दिवसांत ११ वेळा इंधनदरवाढ झाली असून आतापर्यंत ८ रुपयांनी दर वाढले आहेत. आजही मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली. मुंबईत पेट्रोल ११८. ४१ रुपये आणि डिझेल १०२. ६४ रुपये प्रति लीटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत इंधन दर ८० पैशांनी वाढले असून पेट्रोल १०३. ४१ रुपये प्रति लीटर तर, डिझेल ९४. ६७ रुपये प्रति लीटर झाले आहे.