मुंबई आणि पुण्यात कोरनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला काल चार आठवडे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळत नाही, असं सांगतानाच सर्वच जण अडचणीचा सामना करत असल्याने राज्य सरकारने राज्यातील जनतेला ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला आणखी धान्य मिळावं म्हणून आम्ही केंद्राकडे मागणीही केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्यसरकार शिवभोजन योजनेतून रोज साडेपाच सहा लाख लोकांना अन्न पुरवत आहे. लोकांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times