‘करोना’ची साथ आणि राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेताना लोकांना काही सूचनाही केल्या. ‘करोनाचा धोका पाहता आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकानं मास्क वापरणं गरजेचं आहे. केवळ आताच नाही, हे संकट दूर झाल्यानंतरही पुढील काही दिवस हे करावं लागणार आहे. त्यासाठी दुकानातच जायला पाहिजे असं नाही. हा मास्क घरातीलच चांगल्या कपडाच्या दोन-तीन घड्या करूनही बनवात येईल. स्वच्छ धुवून तो पुन्हा वापरता येईल. मात्र, या मास्कचा वापर छत्रीसारखा करू नका. बाहेर जाताना एखाद्या छत्रीसारखा उचलला मास्क आणि निघाला, असं करू नका. प्रत्येकानं स्वत:चाच मास्क वापरायचा आहे. स्वच्छ गरम पाण्यानं धुवून, सुकवून वापरा,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील आरोग्य सेवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ‘प्रत्येक विभागात फिव्हर क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या क्लिनिक कुठे असतील त्याची माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल. सर्दी, खोकला व तापाची लक्षणं असणाऱ्यांनी तिथंच जायचं आहे. फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणी झाल्यानंतर त्यांना पुढचा सल्ला दिला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा:
‘कोविड’ रुग्णालयांचीही आजाराच्या तीव्रतेनुसार विभागणी करण्यात येणार आहे. सौम्य लक्षणं असलेल्यांसाठी एक रुग्णालय असेल. मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी वेगळं रुग्णालय असेल. तर, तीव्र स्वरूपाच्या लक्षणांसाठी व मधुमेह, रक्तदाब, किडनीचे विकार असलेल्या रुग्णांसाठी सुसज्ज असं वेगळं रुग्णालय असेल. तिथं सगळे निष्णांत डॉक्टर असतील. ‘फिव्हर क्लिनिक’ धरून राज्यात आरोग्य सेवेचे चार विभाग असतील. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे करत आहोत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times