नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात वसलेला आहे. अतिदुर्गम भागात अँम्बूलन्स व आरोग्य कर्मचारी पोहोचू शकत नाही. कारण त्या ठिकाणी चांगले रस्ते नाही. म्हणून पर्यायी मार्ग म्हणून तेथील रहिवासी ‘बांबूलन्स’चा वापर करतात. मात्र, त्यातुन रुग्णाला घेऊन जायला बराच कालावधी लागतो आणि त्यामुळे बरेच रुग्ण दगावतात. म्हणून मी ही ‘ड्रोन अँम्बूलन्स’ संकल्पना मांडली आहे, असं प्रणवने सांगितलं.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा वृत्तीला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यात वात्सल्य सेवा समितीच्या माध्यमातून सदर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जिल्हास्तरावर सुमारे 164 प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील 64 प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. तर यातील 16 प्रकल्प विभाग स्तरावर निवडले गेले होते. त्यातील चार प्रकल्प राज्यस्तरावर व चौघांमधील ‘ड्रोन अँम्बूलन्स’वरील प्रकल्पाचे राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण झाल्याची माहिती जिल्हा समन्वयक आशिष वाणी यांनी दिली. नंदुरबार येथील श्रीराम कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी प्रणव आशुतोष वडाळकर याने मार्गदर्शक शिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाचे सादरीकरण केल्याचे वाणी यांनी सांगितले.
खरतर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर फुंकर मारण्यासाठी छोट्या प्रणवच्या डोक्यात ‘ड्रोन अँम्ब्युलन्स’चा विचार मोठाच म्हणावा लागेल. त्याच्या या प्रकल्पाचा मोठ्या स्तरावर विचार केल्यास खर्चही कमी आणि वेळेची बचत होवुन त्यातुन रुग्णाचे प्राणही वाचणार आहेत. त्यामुळे अशा कल्पनेचा विचार करुन त्यातील त्रुटी दुर करत शासनाने विदेशातील धर्तीवर असे प्रकल्प दुर्गम अतिदुर्मग भागात सुरु केल्यास ते नक्कीच कारगीर ठरतील यात शंका नाही.