मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टाच आणली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील राहत्या घराचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ईडी कारवाईचा अंदाज आल्याने संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपये ईडी कार्यालयात जमा केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून राऊत धावपळ सुरू होती, पत्र लिहिलं जात होतं. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या दिल्ली भेटीबाबतही माहिती दिली आहे. (Kirit Somaiya On Sanjay Raut)
‘संजय राऊत यांचे स्नेही आणि व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राऊत यांनी धावपळ सुरू केली होती. राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात मोठी रक्कम कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती. प्रवीण राऊत प्रकरणातही संजय राऊत यांची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही मी दिल्लीत ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून केली होती,’ असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. Sanjay Raut : ईडीकडून संपत्ती जप्त, मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा संजय राऊत यांना फोन
‘मुख्यमंत्र्यांनी जाब का विचारला नाही?’
‘संजय राऊत यांना वाटलं की ५५ लाख रुपये ईडी कार्यालयात जमा केल्याने आणि ईडीच्याच अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई टाळली जाईल. मात्र जेव्हा राऊत यांनी पैसे ईडी कार्यालयात जमा केले होते तेव्हाच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब का विचारला नाही,’ असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची कारवाई ईडीकडून करण्यात आल्यानंतर राऊत यांना अटकही करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे सर्वच नेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.