मुंबई : क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकर.. असं एक समीकरण आहे. खेळत असताना सचिनने आपली मोहिनी जगावर घातलेली होती, ती आता तो निवृत्त झाला तरी कमी झालेली नाही. पण या सर्वामध्ये सचिनने आपला मराठी बाणा सोडलेला नाही. सचिनचा हा मराठी बाणा सध्या चर्चेला विषय ठरत आहे. कारण सचिनने एका मराठी गाण्यावर ठेका धरला असून त्याचा हा व्हिडीओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधील सामने खेळण्यासाठी पुण्याला जात असताना हा व्हिडीओ काढण्यात आला आहे. सचिन आणि भारताचे माजी खेळाडू किरण मोरे हे एका गाडीने प्रवास करत आहेत आणि या वेळी गाडीमध्ये ‘मी डोलकर… डोलकर’ हे गाणं लागल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यावर सचिनने चांगलाच ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण गाण सुरु असताना सचिन चांगलाच आनंदात होता आणि या गाण्यावर ठेका धरत काही स्टेप्सही करत होता. सचिनने यावेळी हे जुनं कोळीगीत लावलेलं होतं, सध्या अशी जुनी गाण ऐकायला मिळत नाहीत. पण सचिन हा गाण्यांचा आणि खासकरून मराठी गाण्यांचा चाहता आहे आणि ही गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यापूर्वी सचिनने काही मराठी गाण्यांवर ठेका धरला होता. पण सचिन अजूनही जुनी मराठी गाणी विसरलेला नाही, हे पाहून मराठी माणसाला नक्कीच अभिमान वाटेल. सचिने जे काही वैयक्तिक व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यामध्ये मराठीचा भाषा ही ओघानेच आल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन आणि त्याच्या आईचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सचिनवर कसे मराठमोळे संस्कार झालेले आहेत, हे पाहायला मिळाले होते. आता सचिनने जुन्या मराठी गाण्यावर ठेका धरत आपण अजूनही या धावत्या जगात मराठी गाणी ऐकतो, हे दाखवून दिले आहे. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चाहत्यांना डोक्यावर घेतला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here