नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेसच्या नाराज आमदारांची अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे २० ते २५ आमदार उपस्थित होते. यावेळी आमदारांनी सोनिया गांधी यांच्यासमोर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या आमदारांनी सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत केला. (Sonia Gandhi Meeting With Congress Leaders)

पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या एका गटाने सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काही दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर काल (मंगळवारी) रात्री उशिरा या आमदारांना गांधी यांच्या भेटीची वेळ मिळाली. या बैठकीत काँग्रेस आमदारांच्या मनातील खदखद बाहेर पडली. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचेच पालकमंत्री पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचं या आमदारांनी सोनिया गांधी यांच्या लक्षात आणून दिलं.

काँग्रेससाठी वाटचाल आव्हानात्मक; सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना केलं हे महत्त्वाचं आवाहन

काँग्रेस आमदारांनी कोणती मागणी केली?

सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदारांनी पक्षाच्याच मंत्र्यांविरोधात बंडाचा झेंडा फडकावला. महाराष्ट्रात काँग्रेसचे जे मंत्री कार्यक्षम नाहीत, अशा मंत्र्यांची खाती बदलण्यात यावीत, अशी मागणी या आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केल्याचे समजते. तसंच राज्यात पक्षाला मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बदलाचीही मागणी या आमदारांकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक

राज्यातील काँग्रेस आमदार सोनिया गांधी यांना भेटत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा विधीमंडळ पक्षाचे गटनेते या बैठकीला उपस्थिती नव्हते. या बड्या नेत्यांना टाळून नाराज आमदारांनी थेट सोनिया गांधी यांना भेटणं पसंत केलं. यावेळी सोनिया गांधी यांनीही आमदारांनी आपलं म्हणणं मांडण्यास पुरेपूर वेळ दिला. त्यामुळे या बैठकीनंतर आता राज्यातील काँग्रेस मंत्र्यांमध्ये काही फेरबदल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here