या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर चांगलेच संतापलेले दिसले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा जाहीरपणे शिवराळ भाषेत उद्धार केला. किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत जमा झालेले पैसे राजभवनाकडे सुपूर्द करू, असे म्हटले होते. मात्र, हे पैसे राजभवनाला देण्यातच आले नाहीत. राजभवनाकडून माहिती अधिकारातंर्गत हा खुलासा करण्यात आला. महाराष्ट्रात भाजपचे राज्यपाल आहेत. आमचा शाखाप्रमुख तिकडे बसलेला नाही. भाजपचा प्रमुख आधारस्तंभ राजभवनात बसले आहेत. त्यांच्याकडूनच सेव्ह विक्रांत मोहीमेचा निधी आपल्याला मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती ऑन पेपर देण्यात आली आहे. याच्यापेक्षा आणखी कोणता वेगळा पुरावा हवा आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.