नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संपत्तीवर टाच आणल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. तसंच केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ‘आयएनएस विक्रांत भंगारात जाऊ नये म्हणून राजभवनामध्ये पैसे जमा करू, असं सांगून किरीट सोमय्या यांनी लोकांकडून पैसे घेतले, मात्र सोमय्या यांनी हा पैसा स्वत:च्या निवडणुकीसाठी वापरला. राष्ट्रीय सुरक्षेशी आणि देशभावनेशी खेळणारा असा प्रकार इतिहासात याआधी कधी झाला नव्हता. भाजपला याचं उत्तर द्यावं लागेल. जर किरीट सोमय्या यांना या क्षणी केंद्रीय सुरक्षा व्यवस्था दिली असेल तर केंद्र सरकारने या देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या एका देशद्रोही व्यक्तीला अशा प्रकारची सुरक्षा देऊन राष्ट्राशी धोका केला आहे,’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On Kirit Somaiya Allegations)
‘या प्रकरणाची महाविकास आघाडी सरकारने तर चौकशी करायला हवी, पण त्यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपची पदाधिकारी असलेल्या ईडीनेही जर ते निष्पक्ष असतील तर चौकशी करायला हवी. त्यांना या चौकशीत काही सापडत नसेल तर मी मदत करेन. या कटात किरीट सोमय्या यांच्यासह अनेक जणांचा सहभाग आहे, मात्र सोमय्या हे प्रमुख सूत्रधार आहेत,’ अशा शब्दांत राऊत यांनी निशाणा साधला आहे. Sanjay Raut: किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
आयएनएस विक्रांतसाठी जमा करण्यात आलेल्या निधीवरून संजय राऊत यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘किरीट सोमय्या यांनी जनतेकडून घेतलेले पैसे राजभवनात जमा केले नाहीत. त्यामुळे हे पैसे कोणाच्या घशात आणि खिशात गेले? माझ्या माहितीप्रमाणे हा राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘केंद्र सरकारला लाज असेल तर सुरक्षा काढा’
‘किरीट सोमय्या यांनी देशभावनेशी खेळून कसाब-अफजल गुरूलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला लाज-लज्जा असेल तर किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढून घेण्यात यावी,’ अशी मागणी राऊत यांनी केली आहे.