काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही. माझा खून होणार आहे. असं तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करत आहेत. फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असं राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे. आता थोड थांबा, असं म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारलाही धरलं धारेवर
राज्यात आता कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही, राज्याचे गृहमंत्रीच, मोठ मोठे पोलीस अधीकारी जेलमध्ये जावून बसले आहेत, अनेक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवरही(MVA) टीकेची झोड उठवली. पोलीस बदल्यांच्या बाबतीत मोठा बाजार मांडला गेला. आणि पैसे वसुल करण्याच्या भानगडीत हे पडले आहेत अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करत आहेत. इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच राज्यात झाली आहे. पोलिसांना बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मागितले जात आहेत. यामुळे त्यांचं खच्चीकरण होत आहे, गुंड मोकाट सुटले आहेत. एवढी विदारक परिस्थिती राज्याची आहे. मात्र, हे पाहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर ठाकरे सरकारचा जोरदार समाचार घेतला.