करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातना मास्क वापरण्यात येणं गरजेचं असल्याचं आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. साथीचा रोग कायदा १८९७ अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंगही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्येही मास्क वापरणं अनिवार्य आहे.
यापूर्वी विविध राज्यात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. चंदीगडमध्येही मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं होतं. याशिवाय ओदिशा सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडूनही मास्क वापरण्याचं आवाहन
‘करोनाचा धोका पाहता आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकानं मास्क वापरणं गरजेचं आहे. केवळ आताच नाही, हे संकट दूर झाल्यानंतरही पुढील काही दिवस हे करावं लागणार आहे. त्यासाठी दुकानातच जायला पाहिजे असं नाही. हा मास्क घरातीलच चांगल्या कपडाच्या दोन-तीन घड्या करूनही बनवात येईल. स्वच्छ धुवून तो पुन्हा वापरता येईल. मात्र, या मास्कचा वापर छत्रीसारखा करू नका. बाहेर जाताना एखाद्या छत्रीसारखा उचलला मास्क आणि निघाला, असं करू नका. प्रत्येकानं स्वत:चाच मास्क वापरायचा आहे. स्वच्छ गरम पाण्यानं धुवून, सुकवून वापरा,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times