बारामती : नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याच्या उद्देशाने नवीन शेकडो कोटींच्या पाणी योजनेची कामे बारामतीत सुरू आहेत. नगर परिषदेचा पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प वर्षाला लाखो खर्चून ठेकेदारांच्या मर्जीनुसार अकुशल कामगारांच्या हाती देण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीकरांना पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत आहे. गेला महिन्याभरात मातीमिश्रित अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक भागांत पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बारामती शहरात कोणत्याही प्रकारची पाणी टंचाई नाही. मात्र, नगर परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. वितरित होणारे पाणी १०० टक्के शुद्ध असणे अपेक्षित आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर पडलेल्या पाण्याचा रंगही बदलत नाही आणि वासही कायम राहत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पावर ‘ओ. टी. टेस्ट’ घेण्यात येते. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाण्यात क्लोरिन टाकल्यामुळे या चाचणीचा अहवाल ‘ओके’ मिळतो. परंतु, पाणी वितरित होते, त्या वेळी शहरातील बहुतांश भागातील पाण्यामध्ये मातीचे कण येत असल्याबाबत अनेक तक्रारी नगर परिषदेकडे दाखल झाल्या आहेत. Heatwave Alert! पुढचे ३ दिवस राज्यासाठी धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा माळेगाव विहीर पाणीपुरवठा, खंडोबानगर जलशुद्धीकरण केंद्र आणि बारामती जलशुद्धीकरण प्रकल्प नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पाणी निरीक्षकच नसल्याने ठेक्यावर असणारे अकुशल कर्मचारी आठ दिवसांमध्ये केवळ दोन ते एक दिवस कामावर येत आहेत. या तीन योजनांसाठी वर्षाला ४५ लाख रुपयांचा खर्च नगर परिषद करीत आहे. बारामतीच्या मूळ हद्दीत २० वॉल आउट असून, ते वेळेवर सोडले जात नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘मटा’ला माहिती दिली आहे.
बारामतीचा पाणीपुरवठा दृष्टिक्षेपात
रुई, बारामती (मूळ शहर), ग्रामीण एकूण ग्राहक
– घरगुती : १०२२९
– व्यावसायिक : १९२
– संस्था : ९०
– नगरपरिषद प्रशासनाला वर्षाला दोन कोटी २५ लाख रुपये पाणीपट्टी मिळते.