किरीट सोमय्या यांचा पाय खोलात?
केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध नेत्यांवर कारवाई करण्यात येत असताना राज्याच्या गृहमंत्रालयानेही आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या राऊत यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केला. INS विक्रांत भंगारात निघू नये, असं सांगत किरीट सोमय्या यांनी लोकांकडून पैसे जमा केले. माजी सैनिकांनीही यासाठी निधी दिला. मात्र नंतर हा पैसा राजभवनात जमा न करता किरीट सोमय्या यांनी तो आपल्या निवडणुकीसाठी वापरला, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज मुंबईतील एका माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर या प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सोमय्या पिता-पुत्रावर आगामी काळात काय कारवाई करण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.