नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करून देशभावनेशी खेळणाऱ्या किरीट सोमय्या यांची वकिली देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते सोमय्या यांच्यासारख्या देशद्रोही व्यक्तीचं समर्थन करत असताना संघाच्या दिवंगत नेत्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांवर टीका केली. (Sanjay Raut On Devendra Fadanvis)

किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे संजय राऊत चांगलेच भडकले असून त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राऊत यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेले पैसे लाटल्याचा आरोप केला. राऊत यांच्या या आरोपानंतर भाजपचे विविध नेते किरीट सोमय्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. देवेंद्र फडणवीस यांनीही सोमय्या यांची बाजू घेत राऊतांचे आरोप फेटाळून लावले. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल होताच राऊतांचा हल्लाबोल; जनतेलाही केलं आवाहन

‘देशभरात रणकंदन होणार’

आयएनएस विक्रांतचा मुद्दा तुम्ही संसदेत उपस्थित करणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘हा मुद्दा मी लोकसभेत तर उपस्थित करणार आहेच, पण त्यासोबतच या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आणि देशात रणकंदन होणार आहे. कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. सोमय्या यांच्यासारख्या देशविरोधी व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केल्याने आता शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी टोकदार होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here