Mumbai High Court Extends Deadline For St Employees To Resume Work Till April 22 | एसटी कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्या दिवशी धक्का; कोर्टाने दिला नवा अल्टीमेटम
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत आज पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी नवा अल्टीमेटम दिल्याने विलीनीकरणाच्या मागणीबाबत संपकऱ्यांची निराशा झाली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) २२ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. तोपर्यंत जे कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला मार्ग मोकळा असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे संप मिटवून कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर व्हावं लागणार आहे. (Msrtc Strike Status Today)
कामावर रुजू होण्याची तयारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, असं हायकोर्टाने सांगितल्यानंतर एसटी महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जे संपकरी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांच्याविरोधात बडतर्फी, निलंबन किंवा अन्य कारवाई सुरू असली तरी ती मागे घेऊन समज देऊन कामावर घेऊ,’ अशी हमी एसटी महामंडळाने हायकोर्टात दिली आहे.
दरम्यान, ज्यांच्याविरोधात हिंसाचाराबद्दल एफआयआर दाखल आहेत त्यांनाही आम्ही कामावर घेऊ, त्या कारणावरून कामावरून काढणार नाही, मात्र एफआयआरप्रमाणे जी कारवाई व्हायची असेल ती होईल, अशी भूमिका एसटी महामंडळाने हायकोर्टात मांडली आहे. मात्र, याबद्दलही आम्ही योग्य तो आदेश देऊ, असे संकेत हायकोर्टाने दिले आहेत.