ठाणे: मशिदींसमोर भोंगे लावण्यासंदर्भात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या आदेशाविरोधात ठामपणे भूमिका घेणारे पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाची नाराजी ओढावून घेतल्याची चर्चा आहे. सध्या मनसेच्या गोटात या सगळ्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे हे वसंत मोरे (Vasant More) यांच्याविषयी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात त्रोटक भाष्य केले.

येत्या ९ एप्रिलला ठाण्यात मनसेची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला परवानगी मिळावी, यासाठी बाळा नांदगावकर पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गुरुवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना वसंत मोरे यांच्याविषयी विचारण केली. तेव्हा बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, वसंत मोरे यांच्याविषयी राज ठाकरे हे ९ एप्रिलच्या सभेत स्वत:च बोलणार आहेत. आता आमचे सुप्रीमो यावर बोलणार असतील आम्ही त्यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तर पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिवतीर्थवर बोलवण्यात आलेल्या बैठकीविषयी बोलणे त्यांनी टाळले. मी ठाण्यात आलो आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील बैठकीविषयी मला माहिती नाही, असे सांगत बाळा नांदगावकर यांनी काढता पाय घेतला.
Vasant More: मनसेच्या गोटात वेगवान हालचाली; वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज? बैठकीला निमंत्रण नाही

वसंत मोरेंना शिवतीर्थवरील बैठकीचे निमंत्रण नाही

या सगळ्या घटनाक्रमानंतर वसंत मोरे हे देखील मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुक आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडल्याचे समजते. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर या व्हॉटसअॅप ग्रूपवर जाहीरपणे मतभेद सुरू झाले होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी वसंत मोरे स्वत:हून या ग्रुपमधून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. तसेच शिवतीर्थवर बोलावण्यात आलेल्या मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठीही वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे आता वसंत मोरे यांच्यावर काय बोलणार, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here