पुणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर पक्षात चांगलीच उलथापालथ झाली आहे. मशिदीच्या भोंग्यांबद्दल राज यांनी घेतल्या भूमिकेला विरोध केल्यामुळे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More Mns) यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून नगरसवेक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पद काढून घेत मनसेने पंख छाटल्यानंतर वसंत मोरे यांना लगेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे.

वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी वसंत मोरे पक्षांतराचा निर्णय घेणार का, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, ‘भाजपची स्टाईल लक्षात घ्या, जवळ गेलेल्यांना… ‘

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर तुम्हीही हनुमान चालिसेचं पठण करा, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र मला माझ्या प्रभागात शांतता ठेवायची आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी राज यांचा आदेश धुडकावला. त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतलं. यावेळी झालेल्या बैठकीत मनसेचे विद्यमान नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा वसंत मोरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

मोठी बातमी: राज ठाकरेंकडून वसंत मोरेंची उचलबांगडी; पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अशातच मनसेत झालेल्या उलथापालथीमुळे पक्षाला या निवडणुकीत फटका बसण्याच शक्यता आहे. कारण वसंत मोरे हे पुण्यात मागील १५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत आणि तरुणांमध्ये ते विशेष लोकप्रियदेखील आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पुण्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here