मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं मान्य केलं. पण जगाच्या तुलनेत ही आकडेवारी कशी आहे. याचा तुम्हीच विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. करोना रुग्णांचा हा ग्राफ वाढत असला तरी मला हा ग्राफ वाढू द्यायचा नाही. तो खाली आणायचा आहे. मला राज्यात एकही करोनाचा रुग्ण नकोय, असं सांगतानाच करोना संपूर्ण जगाच्या मागे हात धुवून लागला आहे. पण आपल्याला करोनाच्याच मागे हात धुवून लागायचं आहे. त्यासाठी करोनाविरुद्धच्या लढाईत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी पुढे यावे. सैन्यातील वैद्यकीय विभागातून निवृत्त झालेले माजी सैनिक. निवृत्त वॉर्डबॉय, परिचारिका आणि वैद्यकीय शिक्षण घेऊनही जागा रिक्त नसल्याने हॉस्पिटलमध्ये नोकरी न मिळालेले प्रशिक्षित लोकही या युद्धात सहभागी होऊ शकतात. तुमची आमच्यासोबत काम करण्याची तयारी असेल तर संपर्क साधा. तुमची महाराष्ट्राला गरज आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली.
ज्यांना करोनाविरुद्धच्या लढाईत सामिल व्हायचे आहे, त्यांनी Covidyoddha@gmail.com या मेलवर स्वत:चा पत्ता, संपर्क क्रमांक आणि अल्पपरिचय पाठवावा. जे लोक वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहेत. जे प्रशिक्षित आहेत. ज्यांना कामाचा अनुभव आहे, अशा लोकांनीच या मेलवर परिचय पाठवायचा आहे. यावर कुणीही सूचना करू नयेत. नको ते मेसेज करून हा मेल आयडी ब्लॉक करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
घर हेच आपले गडकिल्ले
राज्यात आतापर्यंत ३४ हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात १०१८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील ६१० जणांना सौम्य लागण झाली आहे. तर ११० जणांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. तर २६ जण गंभीर आहेत. आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला असून ८० लोक बरे होऊन घरी गेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. आपण घरोघरी जाऊन चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुण्यात चिंतेचं वातावरण आहे. पण चिंतेचं कारण आहे म्हणून घाबरून जायचे कारण नाही. आपल्याला हा आकडा शून्यावर आणायचा आहे. अमेरिकेसारखा देश जर आपल्याला मदत मागत असेल तर आपणच आपले वीर, आपणच आपले शत्रू आणि आपले घर हेच आपले गडकिल्ले आहेत म्हणून समजा, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times