
दिवंगत मनोहर कदम हे उत्तम सनई वादक म्हणून परिचित होते. तर अशोक कदम तबला, ढोलकी, पखवाज वाजवत. त्यांच्या कौशल्यामुळेच भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत अशोक कदम यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल २५ वर्ष काम केलं. देशा-परदेशात झालेल्या लता दीदींच्या असंख्य कार्यक्रमात अशोक कदम यांनी तबला वादन केलं होतं. संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरर्यंत जपला.

नोटा जुन्या झाल्या तरी…
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘अमृताचा घनू’ हा कार्यक्रम दीदींसोबत कदम यांनी केला होता. २००६ मध्ये पुणे येथे मंगेशकर रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाने सारेच भारावून गेले होते. या कार्यक्रमात दीदींनी स्वतः स्टेजवर येऊन ५ हजार रुपये बक्षीस म्हणून कदम यांना दिले होते. ही लाखमोलाची आठवण कदम यांनी आजही जपून ठेवली होती. या नोटा जुन्या झाल्या असल्या तरी माझ्यासाठी त्यांचे मूल्य हे देवाच्या आशीर्वादा समान असल्याची भावना कदम यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा व्यक्त केली होती.

प्रथमेश म्युझिक अकादमीची स्थापना…कल्याणातही चांगल्या दर्जाचे संगीत साधना केंद्र असावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रथमेश म्युझिक अकादमीची स्थापना केली होती. ज्यातून त्यांची मुलं आदित्य आणि ओंकार ही देखील त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. एवढ्या उच्च पदावर पोहोचूनही पाय मात्र नेहमीच जमिनीवर ठेऊन वावरणाऱ्या अशोक कदम यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.